शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला क्रांती चौक शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा रंगला

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आज सकाळी शहरातील क्रांती चौक येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळा -२०२६ या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थिती लावत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.

सकाळी आठ वाजल्यापासूनच क्रांती चौक परिसरात शिवभक्तांची गर्दी झाली. यावेळी शिवरायांच्या गजराने संपूर्ण परिसर शिवमय झाला. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवभक्तांमध्ये राज्याभिषेक दिनाबद्दल विशेष उत्साह दिसून आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने दुग्धाभिषेक करून शिवराज्याभिषेकाचा ऐतिहासिक क्षण प्रतीकात्मक स्वरूपात साकारण्यात आला. यानंतर उपस्थितांनी शिवरायांच्या कार्याला वंदन करत स्वराज्याच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी विधानपरिषद विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते. अनेकजण पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावत शिवरायांना अभिवादन केले.

ऐतिहासिक आठवण
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली. शतकानुशतके परकीय सत्तेखाली राहिलेल्या जनतेला स्वराज्याचा नवा मार्ग दाखविणार्‍या या ऐतिहासिक घटनेची आठवण जपण्यासाठी आणि नवीन पिढीला त्या इतिहासाची ओळख करून देण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांपासून क्रांती चौक येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा सुरू असून, दरवर्षी या कार्यक्रमाची व्याप्ती वाढत आहे. यंदाही हजारो शिवभक्तांनी सहभाग घेत या परंपरेला अधिक बळ दिले.

शहरात विविध ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा
शहरातील विविध ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. तसेच व्याख्यानासह आदी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवगर्जना, पोवाडे, देशभक्तिपर गीते आणि शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिन हा केवळ उत्सव नसून स्वराज्याच्या आदर्शांचे स्मरण करून देणारा प्रेरणादायी दिवस असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. एकूणच शहरात आजचा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा अत्यंत भव्य, दिव्य आणि संस्मरणीय ठरला. शिवरायांविषयीचा अभिमान आणि स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारा हा सोहळा शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा महत्त्वाचा भाग ठरला.